
इचलकरंजी (दि. १ मे) : स्थानिक इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात गुरुवारपासून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली असून, यासाठी खास दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यापूर्वी इचलकरंजी परिसरातील दिव्यांग लाभार्थ्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी जावे लागत होते. मात्र, तेथे वारंवार पायपीट करावी लागल्यामुळे वेळ आणि खर्च यांची मोठी झळ बसत होती. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असतानाही येथे प्रमाणपत्र देण्यास परवानगी नव्हती. हे लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि फक्त दोन महिन्यांत रुग्णालयास प्रमाणपत्र देण्याची अधिकृत परवानगी मिळवण्यात यश मिळवले.
ध्वजारोहण आणि उद्घाटन समारंभ रुग्णालय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, श्रीरंग खवरे, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, बाळासाहेब माने, विजय पाटील, रुग्णालय समिती सदस्य कपिल शेटके, डॉ. राजू पाटील, डॉ. सोनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर, स्टाफ, रुग्ण आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ, सुसज्ज आणि स्थानिक स्तरावर सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.