
इचलकरंजी | इचलकरंजी महानगरपालिकेत सुरक्षारक्षक नेमणूक करारास मुदतवाढीवरून संतापाची लाट उसळली आहे. प्रस्तावित मुदतवाढीचा करार तातडीने थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा इनाम सदस्य व नागरिकांनी दिला.
महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक कार्यरत असून त्यावर महिन्याला लाखो रुपयांचा अपव्यय होत असल्याची टीका करण्यात आली. सुरक्षारक्षकांचे काम नागरिकांना अडवणे, निवेदन ताब्यात घेऊन वाचणे, कुणाला द्यायचे ते ठरवणे, अरेरावी करणे अशा स्वरूपाचे सुरू असून सामान्य नागरिकांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला. आयुक्त, अति. आयुक्त, उपायुक्त यांच्यासह कार्यालयीन गाड्यांनाही सुरक्षारक्षक लावण्यात आले आहेत. आमदार-खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर इनामं सदस्यांनी अति. आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचीच राहील. सुरक्षारक्षकांच्या करारावर सही करू नका. त्यांना सन्मानाने निरोप द्या. मासिक दहा लाखांचा व वार्षिक कोट्यावधींचा खर्च बंद करा, अशी मागणी केली.
यावेळी राजू कोंन्नुर, अमोल मोरे, राम आडकी, डॉ. सुप्रिया माने, कल्पना माळी, महेंद्र जाधव, विद्यासागर चराटे, उमेश पाटील, अमितकुमार बियाणी, सिद्धार्थ इंगवले, अमोल ढवळे, अभिजित पटवा उपस्थित होते.