इचलकरंजीत पत्रकार राजू म्हेत्रे यांचा सत्कार; डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बैठक उत्साहात

इचलकरंजी, दि. १६ मे : संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला यश हमखास मिळते, त्यामुळे संयम ठेवून परिस्थितीशी लढा दिला पाहिजे, असे प्रेरणादायी उद्गार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी काढले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा पुणे येथे होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे संघटनेची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेल्या पत्रकार राजू म्हेत्रे यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याबद्दल शहराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारप्रसंगी बोलताना कलढोणे यांनी पत्रकारितेतील अडचणी, शासनाची अपेक्षित भूमिका आणि सत्याशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“पत्रकारांनी केवळ प्रसिद्धीच्या बातम्यांवर लक्ष केंद्रित करावे, अशी शासकीय नोकरदारांची अपेक्षा असते. मात्र जेव्हा पत्रकारांनी सत्य मांडण्याचे धाडस केले, तेव्हा त्यांना अडथळा ठरवले जाते. तरीही पत्रकारांनी न घाबरता सत्य समोर आणावे. न्याय मिळतोच,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात संघटनेचे संघटक सचिन बेलेकर यांचा मास्टर कम्युनिकेशन इन जर्नलिझममधे प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. बैठकीत महिला पत्रकारांशी संबंधित मुद्दे, पत्रकार संरक्षण कायदा, आणि डिजिटल मीडियातील अडचणी यावर चर्चा झाली.
कार्यक्रमाचे स्वागत संघटक सचिन बेलेकर यांनी केले, प्रास्ताविक उपाध्यक्ष विजय तोडकर यांनी तर आभार संघटनेचे अध्यक्ष सॅम (सलीम) संजापुरे यांनी मानले.
या वेळी कोषाध्यक्ष रणधीर नवनाळे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती कलढोणे, उपाध्यक्षा अंजुम मुल्ला, सचिव संगीता हुग्गे, रसूल जमादार, मुबारक शेख, संतोष मोकाशी, अंकुश पोळ आदी उपस्थित होते.
ही बैठक डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी ऊर्जा देणारी ठरली असून, आगामी राज्यस्तरीय मेळाव्याच्या अनुषंगाने संघटनेची एकजूट अधिक बळकट झाली आहे.