
कर्तव्य विसरून ढोल-ताशांत रमले इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी
इचलकरंजी | विनायक कलढोणे
गत महिनाभरापासून इचलकरंजी महानगरपालिकेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर लावले गेले, ढोल-ताशांच्या मिरवणुका काढल्या गेल्या, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. मात्र या सर्व जल्लोषाकडे शहरातील सामान्य नागरिकांनी व राजकीय नेत्यांनीही सर्रास पाठ फिरवली आहे.
महापालिकेच्या वर्धापन दिनासाठी खास ठराव करून मोठ्या प्रमाणावर खर्च केला गेला. महापालिकेच्या तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी काही निधी सामाजिक संस्था, ट्रस्ट व मक्तेदारांकडूनही उचलला गेला. मात्र हा आनंद आणि उत्साह फक्त महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या मित्रमंडळींपुरताच सीमित राहिला.
याच काळात शहरातील वास्तव काही वेगळेच चित्र दाखवत होते. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, गल्लोगल्ली पडलेले कचऱ्याचे ढीग आणि नालेसफाईचे काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे शहरवासी त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत या विभागाच्या प्रमुखांचा ‘किंगमेकर’ म्हणून मोठ्या फलकांवर गौरव करण्यात आला, हे विशेष बोलके ठरले.
काल काढलेल्या मिरवणुकीत तर शहराची नीट ओळख नसलेल्या अधिकाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहात ठुमके लावले, ढोल-ताशांचा आस्वाद घेतला. लोकांच्या प्राथमिक गरजा, समस्या आणि विकासकामे बाजूला ठेवून अधिकारी या धांगडधिंगात मग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.यामुळे “महापालिकेकडे खरोखर लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे का?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमदार आणि खासदार यांचेही या विषयाकडे दुर्लक्षच दिसून येत आहे. परिणामी, प्रशासक राजमुळे आधीच त्रस्त झालेले नागरिक आता महापालिकेच्या अशा उत्सवबाजीला कंटाळले आहेत. महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या कामांना थांबवून वर्धापन दिनाच्या रॅली व जल्लोषात रमलेले आहेत.
———–
भाग २ मध्ये पुढील आर्थिक हिशेब, मक्तेदारांकडून उचललेल्या रकमांचे तपशील आणि नागरिकांचा रोष वाचा.