
इचलकरंजी | मागील पाच-सहा महिन्यापासून ऑनलाईन आणि डीबीटीमुळे अनेक लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नसल्याने वृध्द निराधार विधवा दिव्यांग पेन्शनधारक संघटनेने संजय गांधी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करत जोरदार निर्दशने केली. १५ जुलैपर्यंत लाभार्थ्यांच्या प्रश्नांची निर्गत न झाल्यास कार्यालयासमोरच धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संजय गांधी योजनेच्या श्रावण बाळ, वृध्दापकाळ, विधवा, अपंग योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शनसाठी बँक आणि संजय गांधी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. पेन्शनधारकांना आपली पेन्शन कोणत्या बँकेत जमा झाली किंवा कोणत्या कारणामुळे पेन्शन आली नाही हेच कळेनासे झाले आहे. याबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी वृध्द निराधार विधवा दिव्यांग पेन्शनधारक संघटनेने आठ दिवसांपूर्वी अप्पर तहसिलदार कार्यालयात निर्दशन करुन प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप प्रश्न न सुटल्याने संघटनेच्यावतीने संजय गांधी कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या मारुन निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्यालयीन कर्मचारी माधुरी पाटील यांनी लाभार्थ्यांच्या आडचणी समजून घेतल्या आणि लाभार्थ्यांच्या कागदपत्राची छाननी करुन त्याचा अहवाल संघटनेला देऊ असे सांगितले. त्यामुळे १५ जुलैपर्यंत लाभार्थ्यांच्या प्रश्नांची निर्गत न झाल्यास राज्य शासनाच्या विरोधात संजय गांधी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे मार्गदर्शक सदा मलाबादे, महिला अध्यक्षा उषा माळी यांनी दिला. यावेळी भरमा कांबळे, भाऊसाहेब कसबे, दादासो कांबळे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.