
इचलकरंजी/प्रतिनिधी :
पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा मर्यादेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज इचलकरंजीत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत नागरिकांना वेळेवर स्थलांतराचे आवाहन करण्यात आले.
गेल्या चार दिवसांपासून पंचगंगा नदीत वाढलेली पाणीपातळी आज इशारा मर्यादेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी इचलकरंजी शहराला भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदी परिसराची पाहणी करत संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनास आणीबाणी सेवा कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यकतेनुसार वेळेवर स्थलांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भेटीदरम्यान महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आतापर्यंतच्या पूरनियंत्रण उपाययोजनांची माहिती दिली. प्रशासन अलर्ट मोडवर असून आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आरोग्य विभाग, अग्निशमन दल व पोलिसांसह सर्व यंत्रणा सतत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी महापालिका उपायुक्त नंदू परळकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे, आरोग्य अधिकारी दुरूककर, पोलीस निरीक्षक सचिन भुते, अग्निशमन दलाचे जवान तुषार हेगडे यांच्यासह पोलिस बॉईज असोसिएशनची टीम व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.