
भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते आणि स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अजित पवारांचा राणेंना फटकारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फटकारले. “जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य कोणीही करू नये,” असे म्हणत त्यांनी राणेंना कान टोचले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे शासक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमोल मिटकरींचा प्रतिवाद: मुस्लिम सरदारांची यादीच ट्विट केली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याला जोरदार प्रतिउत्तर देत, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची १९ जणांची यादीच ट्विट केली. त्यांनी राणेंचे नाव न घेता टोला लगावत म्हटले की, “मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवळ हिंदूंचे राज्य नव्हते, ते केवळ मुस्लीमविरोधी राष्ट्र नव्हते. ते १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांचं स्वराज्य होतं.”
मिटकरींच्या ट्विटमुळे वाद आणखी चिघळला असून, सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, पुढे यावर काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.