
इचलकरंजी | यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या आव्हानात्मक स्पर्धात्मक परीक्षांची तयारी होत असते. त्यामुळे नामदेव युवक संघटनेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणार्या आंतरशालेय स्पर्धांचे कार्य कौतुकास्पद आहे. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात संतश्रेष्ठ नामदेवांनी साहित्याचे लिखाण केले त्यांचे कार्य सर्वांनाच दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी काढले.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित आंतरशालेय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या आंतरशालेय स्पर्धांमध्ये डीकेटीई संस्थेच्या नारायण मळा येथील प्राथमिक विद्यामंदिर आणि इचलकरंजी हायस्कूल या शाळांनी अनुक्रमे प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावत बाजी मारली.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी महोत्सवानिमित्त श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्यावतीने आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विजेत्यांना माजी मंत्री प्रकाश आवाडे, सावली केअर सेंटर कोल्हापूरचे किशोर देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्रारंभी श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर यांनी आंतरशालेय स्पर्धांचा उद्देश स्पष्ट करून प्रास्ताविक केले. स्पर्धा अहवालवाचन प्रा. अनिल अवसरे यांनी तर सूत्रसंचालन सीमा उरूणकर यांनी केले. आभार युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकार यांनी मानले.
इयत्ता 1 ली ते 10 तील विविध गटात चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध, बुध्दिबळ, वक्तृत्व , पाठांतर, गायन, वेशभूषा स्पर्धा मध्ये सुमारे तीन हजार विध्यार्थानी सहभाग घेतला होता. यावेळी उमाकांत कोळेकर, अनंतराव कुडाळकर, मधुकर खटावकर, चंद्रकांत पाडळकर, सौ. सरोज उरुणकर, यांच्यासह श्री नामदेव समाज सेवा मंडळ, नामदेव युवक संघटना, महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव व परीक्षक उपस्थित होते.