इचलकरंजी | शहरातील नामदेव भवन येथे एक हजार वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक व पवित्र सोमनाथ शिवलिंग दर्शन यात्रा अंतर्गत आले होते. याप्रसंगी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता. धनगरी ढोलांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि हर हर महादेवच्या जयघोषात शिवलिंगाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शिष्य आणि वरिष्ठ प्रशिक्षक दर्शक हाथीजी यांचे तसेच वेद विज्ञान महाविद्यापीठ, बंगळुरू येथील वैदिक पंडितांचेही सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.
दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. लहानथोर, महिला-पुरुष, युवक-युवती अशा सर्व स्तरातील भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रसंगाचा लाभ घेतला.

सायंकाळी भव्य सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला. भजन, प्रार्थना व ध्यान यामध्ये दोन हजारपेक्षा अधिक भक्तांनी सहभागी होत आपल्या आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिविंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे, स्वयंसेवक नमिता हूल्ले, राहुल रायनाडे, नारायण जोशी, मनोहर कुंभोजे, विजय साळुंखे, नितीन जमाले, गोपाल चांडक, प्रदीप दरीबे, महेश व संगीता सारडा, सर्वेश बांगड, विशाल व विद्या पाटील, दीपक हिंगलजे, कमलेश्वर कदम यांनी महत्वपूर्ण सेवा दिली. हा दिवस इचलकरंजीकरांसाठी एक अद्वितीय आणि अविस्मरणीय आध्यात्मिक पर्वणी ठरला.
