
इचलकरंजी : बाजारभावापेक्षा कमी दराने बिलासहीत सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची ६ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या सुभाष संकपाळ, साक्षी सुभाष संकपाळ (दोघी रा. नांदणी रोड यड्राव) व विकी आगवाणी (रा. आसरानगर हनुमान मंदिर चौक) अशी त्यांची नांवे आहेत. यापैकी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रेश्मा चाँदसाहेब जमादार (वय ३५ रा. सहारानगर रुई) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विद्या व साक्षी संकपाळ आणि विकी आगवाणी यांनी संगनमत करत फसवणूकीच्या उद्देशाने बाजारभावापेक्षा कमी दरात सोने-चांदी बिलासहित देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रेश्मा जमादार यांचेकडून २ लाख रुपये, त्यांच्या मैत्रिणी शितल विठोबा वाघमारे यांचेकडून ३० हजार रुपये व सलीमाबी जावेद नदाफ यांचेकडून ३ लाख ८५ हजार रुपये असे ६ लाख १५ हजार रुपये घेतले. १६ नोव्हेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत तिघांनी या रकमा घेतल्या. त्यानंतर वारंवार मागणी करुनही सोने-चांदी अथवा पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक केल्याप्रकरणी रेश्मा जमादार यांनी शिवाजीनगर पोलिसात तिघांविरुध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्या संकपाळ व विकी आगवाणी यांना अटक केली आहे.