“दहावी-बारावी नंतर पुढे काय?” भाग १

- विनायक कलढोणे
संपादकीय : “दहावी-बारावी नंतर पुढे काय?” हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक पालकासाठीही मोठ्या चिंतेचा विषय ठरतो. आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल व्हावे, त्याने चांगले शिक्षण घ्यावे, आणि उत्तम नोकरी मिळवावी – ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा. या इच्छेच्या प्रवाहात हल्लीच्या काळात शिक्षण संस्थांचा गोंडस महाल आणि जाहिरातींचे मायाजाल पालकांना भुरळ घालत आहे.
आजच्या घडीला पैसा हा सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहज उपलब्ध झाला आहे. बँकांचे शैक्षणिक कर्ज तात्काळ मिळते, EMI च्या योजना आहेत, त्यामुळे “शिकवायचं कुठे?” यापेक्षा “किती खर्च करायचा?” हेच जास्त महत्वाचं ठरतंय. आणि याचाच गैरफायदा घेत काही खासगी शिक्षण संस्था आपला “तांब्याचा महाल” उभा करतात.
अगदी मोठमोठ्या इमारती, AC क्लासरूम्स, डिजिटल बोर्ड्स, आणि चमकदार जाहिराती — हे सर्व पाहून पालक प्रभावित होतात. संस्थेच्या प्रवेशद्वारावरच “TOPPERS FACTORY” अशा शब्दात आपला ब्रँड ठसवणाऱ्या या अॅकॅडमी खरंच यश देतात का?
खरंतर वास्तव फार वेगळं आहे. एका बॅचमध्ये 300 ते 500 विद्यार्थी शिकतात, त्यातील यशस्वी होणारे हातावर मोजण्याइतके असतात. उरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे पाच-सात लाख रुपये खर्च होऊनही त्यांना ना दर्जेदार शिक्षण मिळते, ना आश्वासक करिअर.
हे सर्व कशामुळे? कारण पालक फक्त संस्थेच्या बाह्य स्वरूपाकडे बघतात – मोठी इमारत, महागडी जाहिरात, काही मोजक्या टॉपर्सचे फोटो आणि “100% निकाल” अशा घोषणा. प्रत्यक्षात मात्र शिक्षकांचा दर्जा, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, आणि त्यांच्या क्षमतेनुसार पाठिंबा याचा अभाव असतो.
या सगळ्यात खिशाला कात्री बसते ती पालकांची. EMI भरताना घराच्या इतर गरजांवर तडजोड करावी लागते. याशिवाय अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊनही नोकरीच्या बाजारात मागे पडतात. कारण त्यांच्या शिक्षणात केवळ मार्क मिळवण्यावर भर असतो, कौशल्यविकास आणि वास्तवात वापरता येणारे ज्ञान याचा अभाव असतो.
पालकांनी या प्रलोभनांना बळी पडू नये. शिक्षण संस्थेची निवड करताना बाह्य झगमगाटापेक्षा दर्जा, शिक्षकांचे अनुभव, आणि आधीच्या विद्यार्थ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड याचा विचार व्हायला हवा. पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करणारी संस्था हवी.
शेवटी, शिक्षण हे दीर्घकालीन गुंतवणूक आहे – ती फक्त इमारतीत न करता, मुलांच्या विकासात केली पाहिजे. चकचकीत क्लासेसपेक्षा नावाजलेल्या, पण विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्राधान्य देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षण दिल्यास आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्टिकोनातून समाधानकारक ठरते.