
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ॲनस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्योजिका होणार मी’ या उपक्रमाअंतर्गत महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दि. ९ मे रोजी दुपारी ४ वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे होणार आहे.
या मेळाव्याचा उद्देश नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या महिला व युवतींना आवश्यक माहिती व मार्गदर्शन प्रदान करणे हा आहे. कार्यक्रमात विविध तज्ज्ञ वक्ते उपस्थित राहून महिला उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठीचे मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमात इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर अजयकुमार पाटील, स्टार्टअप ट्रेनर व मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट पुष्कर कर्नावट (मुंबई) आणि भागीरथी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक (कोल्हापूर) या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या मेळाव्यात उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, शासनाच्या विविध योजना, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याची माहिती, उत्पादनाचे मार्केटिंग, तसेच उद्योगासाठी उपलब्ध आर्थिक सहाय्य योजना यावर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि उद्योगाच्या माध्यमातून स्वतःबरोबर समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश पाटील, प्रकल्प समिती अध्यक्ष अंबरीश सारडा, सेक्रेटरी नागेश दिवटे व ॲनस कमिटीच्या अध्यक्षा सायली होगाडे यांनी केले आहे.
स्वतंत्र कार्यशाळेचे आयोजन
उद्योगात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला व युवतींसाठी स्वतंत्र कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
संपर्क:
रोट. घनश्यामजी सावलानी – ९४२२० ४३५१५