“दहावी-बारावी नंतर पुढे काय ? -भाग २

- विनायक कलढोणे
संपादकीय : शिक्षण म्हणजे ज्ञानार्जन, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्याच्या दृष्टीने योग्य कौशल्ये आत्मसात करणे. पण आजच्या काळात शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या शिक्षण संस्थांनी आकर्षक इमारती उभारून, महागड्या जाहिराती करून पालकांना फसवण्याचा धंदा सुरू केला आहे. हजारो विद्यार्थी भरती होतात, पण यश मिळते ते केवळ निवडक काहींनाच. उरलेल्यांचे काय? याचा विचार कोण करणार?
चकचकीत जाहिराती आणि भुलवणाऱ्या आश्वासनांची खेळी
शहरातील नामांकित शैक्षणिक अकॅडमी किंवा क्लासेस यांच्या भव्य जाहिराती आज ठिकठिकाणी झळकत असतात –
- “१००% निकालाची खात्री!”
- “टॉपर्स घडवणारी अकॅडमी!”
- “सर्वोत्कृष्ट शिक्षण, उत्तम करिअरची हमी!”
हे वाचून पालक आणि विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने या संस्थांकडे धाव घेतात. लाखोंच्या फी भरतात. मात्र निकाल हाती लागताच वास्तव समोर येते. शेकडो विद्यार्थ्यांपैकी केवळ मोजकेच यशस्वी होतात. बाकीच्यांना पैशाचा आणि वेळेचा फटका बसतो.
महागडी फी आणि गुणवत्तेचा अभाव :
काही संस्थांमध्ये फी इतकी महागडी असते की मध्यमवर्गीय पालकांना कर्ज काढून फी भरावी लागते. पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन, अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि शिक्षकांची पात्रता याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. विद्यार्थ्यांना केवळ ‘डिग्री’ मिळते, पण ज्ञान आणि कौशल्य नाही.
पालकांसाठी सावधगिरीचे इशारे
➡ ब्रँडच्या मोहात पडू नका: फक्त नाव मोठे आहे म्हणून संस्थेची निवड करू नका. त्या संस्थेतील निकाल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अभ्यास करा.
➡ विद्यार्थ्यांची संख्या आणि निकाल तपासा: शेकडो विद्यार्थी भरती करून मोजक्यांनाच उत्तीर्ण करणाऱ्या संस्थांचा जाळा ओळखा.
➡ प्रॅक्टिकल शिक्षणावर भर द्या: फक्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यावर नव्हे, तर प्रत्यक्ष कौशल्य शिक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थांची निवड करा.
शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. केवळ जाहिराती आणि आलिशान इमारती पाहून शिक्षण संस्थांची निवड करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा.