
इचलकरंजी | मे महिन्याच्या प्रखर उन्हात शहरातील नागरिकांना लाईट नसल्याचा दाहक अनुभव सहन करावा लागत आहे. कारण, इचलकरंजी महानगरपालिका आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन महिन्यांपासून झाडतोड मोहीम राबवली जात असून, त्या निमित्ताने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला आहे.
या मोहिमेमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, तर घरी असणारे जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल सुरु आहेत. उष्णतेने घरात बसणं मुश्कील झालं आहे आणि बाहेर पडायला उन्हाचा तडाका अंगावर घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. लाईट बंद करून झाडं तोडण्याचा प्रकार केवळ अडाणीपणाचं उदाहरण आहे, अशी टीका नागरिक करत आहेत.
नेमाने झाडे तोड करायची असतील, तर सकाळी ६ ते १० या वेळेत हा उपक्रम पार पाडल्यास नागरिकांना त्रास कमी होईल. या वेळेत उन्हाचा तडाका तुलनेने कमी असतो, त्यामुळे वीज खंडित करून झाडतोड केली तर ती नागरिकांसाठी फारशी त्रासदायक ठरणार नाही. मात्र, नेमका कोणत्या मक्तेदाराच्या लाडासाठी दिवसाच्या मध्यावर, सगळ्यात जास्त उष्णतेच्या वेळी वीज खंडित केली जाते, हे महापालिका व महावितरणलाच माहीत! नागरिक याला ‘ठरवून हैराण करण्याची योजना’ मानत आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या झाडतोड मोहिमेत नियमांचे पालन झाले की नाही, याबाबत प्रशासन गप्प आहे. झाडं तोडायची, पण त्यासाठी वारंवार वीज खंडित करून नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायची, हे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या इचलकरंजीकर महापालिका व महावितरणच्या या गलथान कारभारावर ग्रामीण भाषेत खरमरीत तोंडसुख घेत आहेत. उन्हात भाजलेल्या जनतेच्या रोषाचा भडका कधी उडेल सांगता येत नाही, त्यामुळे प्रशासनाने तातडीने या झाडतोड मोहिमेला शिस्त लावावी, अशी मागणी शहरातून होत आहे.