इचलकरंजी : शहरात उद्भवणारी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने शहरातील काळ्या ओढ्याची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर रुंदीकरणाचेही काम सुरु आहे.

सन 2019 आणि सन 2021 साली पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे , महापालिका विभाग प्रमुख तसेच पुर क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शहरातील पुर क्षेत्राची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान शहरातील काळ्या ओढ्याची पाहणी केल्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी पावसाळ्यापूर्वी तातडीने काळ्या ओढ्याची स्वच्छता करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले होते. या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने काळ्या ओढ्याची स्वच्छता आणि रुंदीकरणाचे काम सुरू करणेत आलेले असून पावसाळ्यापूर्वी काळा ओढ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे.