
इचलकरंजी | विनायक कलढोणे
इचलकरंजी येथील पुरवठा अधिकारी सध्या प्रशिक्षणासाठी गेले असल्यामुळे स्थानिक पुरवठा कार्यालयाचा संपूर्ण कारभार गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प आहे. परिणामी, गरजू आणि वंचित नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सामान्यपणे, जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्यास शासनाकडून नायब तहसीलदारांना प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र, यावेळी प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोजच्या दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला असून रोज शेकडो नागरिक कामासाठी तासन्तास वाट बघून उपाशीपोटी माघारी फिरत आहेत.या ठप्प कामकाजाचा सर्वाधिक फटका संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित प्रकरणांना बसला आहे. गरजू नागरिकांचे अर्ज, कागदपत्र पडताळणी, शिफारशी आदी महत्वाची कामे पूर्णपणे थांबलेली आहेत.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेवर अन्याय होत आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करून कार्यालय सुरु करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.