
इचलकरंजी | विनायक कलढोणे
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १३ मधील विविध भागांत पाण्याच्या अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी, अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे केली आहे.
दि. १२ जून २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात, दातार मळा गल्ली क्र. १ व २, चौडेश्वरी मंदिर परिसर, मथूर हायस्कूल रिंगरोड परिसर, लंगोटे मळा, आवाडे मळा, काडापूरे तळ, नरेंद्र हौसिंग सोसायटी, तांबे मळा, नाईक मळा, संत मळा, गुरुकन्नन नगर मठ आणि बरगे मळा या भागांमध्ये पाणी अत्यंत कमी दाबाने येते व त्यामुळे नागरिकांना दररोज तासन्तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, असे नमूद करण्यात आले आहे.
या परिसरातील पाईपलाइन यंत्रणा २० ते २५ वर्षे जुनी असून ती पूर्णतः जीर्ण झाली आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजांमुळे ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने, नवीन पाईपलाइन टाकून नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
श्री. दाभोळे यांनी प्रशासनाकडे तात्काळ सर्वेक्षण करून नवीन पाईपलाइन टाकण्याची कार्यवाही हाती घ्यावी, अशी विनंती केली आहे. या मागणीला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा असून, लवकरच निर्णय न झाल्यास आंदोलक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो – गुगल साभार