इचलकरंजी/प्रतिनिधी –
यंत्रमागधारक यांनी मांडलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत त्या प्राधान्याने दूर केल्या जातील. तसेच यंत्रमागधारक व महावितरण यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महावितरण कंपनी इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी दिले. त्याचबरोबर यंत्रमागधारकांनीही महावितरणला पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महावितरणच्या इचलकरंजी विभागाचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी येथील दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. एस. हाथोळकर व प्रसाद अवघडे, उपकार्यकारी अभियंता एस.बी. चौगुले, उपव्यवस्थापक एस.बी.गोसावी हे उपस्थित होते. पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोंदिल यांचे स्वागत केले. श्री. पाटील यांनी, पॉवरलुम असोसिएशनच्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती देऊन महावितरण व पॉवरलुम असोसिएशन यांच्यातील यापूर्वीचे संबंध व सहकार्य अशाचप्रकारे आपल्याकडून पुढे चालू राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच शहापूर, तारदाळ, खोतवाडी, आमराई मळा येथील सबस्टेशन अद्याप सुरू झालेले नाही, नविन सबस्टेशन जागेची उपलब्धता, आवाडे सबस्टेशन महापूरात पाण्याखाली जाते त्यामुळे त्याची ऊंची वाढविणे, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, मागेल त्याला त्वरीत वीज कनेक्शन मिळणे, यंत्रमागधारकांच्या वीज बिलात आलेली पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड व्याजाची रक्कम कमी करणे, पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न, वीज ग्राहकांच्या गाडी पार्कीगसाठी सोय, इचलकरंजी व परिक्षेत्रासाठी कर्मचार्यांची नियुक्ती, लॅडर व्हेईकल, तीन शिफटमध्ये कर्मचारी, पुर्वीप्रमाणे मागेल त्याला मल्टीपार्टी व एकाच शेडमध्ये अनेक कनेक्शन मिळावे, स्मार्ट मिटर व प्रिपेड मिटर, मेंटनन्स व साहित्य, इचलकरंजीच्या महावितरण कंपनीची प्रतिमा उंचावणे आदी प्रश्न उपस्थित करून त्यामध्ये आपण स्वत: लक्ष घालून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.
यावेळी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, प्राईड इंडिया पार्कचे चेअरमन सुरेश आमासे यांच्यासह प्रतिष्ठीत कारखानदार उपस्थित होते.