
इचलकरंजी | येथील मोठे तळे परिसरात निर्माण झालेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर मोठे तळे खोकीधारक संघाच्या वतीने बुधवारी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. येथील मोठे तळे परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी सुविधाच नसल्याने याठिकाणी पावसाचे पाणी साचुन दलदल निर्माण झाली आहे. त्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून खोकीधारकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातूनच साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दलदलीमुळे ग्राहकांना दुकानदारांपर्यंत पोहोचता येत नाही. याबाबत महापालिका प्रशासनाला कळवुनही दुर्लक्ष होत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने उपायुक्त अशोक कुंभार यांची भेट घेऊन विविध समस्यांचा पाढा वाचला. यावेळी सदा मलाबादे यांनी आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर, अभियंता बाजी कांबळे यांनी 4 दिवसात परिसरात आवश्यक ती स्वच्छता करु, मुरूम टाकु आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. उपायुक्त कुंभार यांनी भागातील स्वच्छता आणि अन्य समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबधित विभाग दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात अफसर जमादार, मंगल महाजन, रवि नवनाळे, हिदायत अत्तार, विलास माने, श्रीकांत पाटील, अब्दुल पठाण, पिंटू लाटणे आदींसह खोकीधारक उपस्थित होते.