
कर्तव्य विसरून ढोल-ताशांत रमले इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी – भाग २
इचलकरंजी | विनायक कलढोणे
त्रिवार्षिकपुर्तीनिमित्त इचलकरंजी महापालिकेच्या अधिकारी वर्गांनी जोरदार जल्लषो केला. स्वत:च्या अधिकारांचा वापर करत “निधी” उभा केला. दोन्ही हाताने पैसा उधळून महापालिकेचा वर्धापन दिन आपल्याच मर्जीत उत्साहात साजरा केला. आता हा जल्लोष कशासाठी होता, याचा इचलकरंजीकरांना काय फायदा झाला असा सवाल उमटत आहे. त्याचबरोबर उत्सवासाठी उभारलेल्या खर्चाचे विचित्र आर्थिक चित्र समोर येऊ लागले आहे. गेल्या महिन्यात महापालिकेने खास महासभेत ठराव करून मोठ्या प्रमाणावर निधी या कार्यक्रमासाठी मंजूर केला. तसेच महापालिकेच्या तिजोरीवर ताण येऊ नये यासाठी काही सामाजिक संस्था, ट्रस्ट आणि मक्तेदारांकडूनही रक्कम गोळा करण्यात आली. मात्र या व्यवहारात पारदर्शकतेचा सर्वथा अभाव दिसून आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या वर्धापन दिनासाठी जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. यापैकी काही रक्कम थेट ठेकेदार आणि मक्तेदारांकडून ‘सुविधा शुल्क’ अथवा ‘स्वयंप्रेरणेने’ घेतल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा लेखाजोखा अद्याप महापालिकेच्या कोणत्याच अधिकृत दस्ताऐवजात स्पष्टपणे नोंदवलेला नाही. काही मक्तेदारांनी आपल्यावर दबाव आणल्याचीही कुजबुज सुरू आहे.
शहरातील कचऱ्याचा ढीग

त्याच वेळी शहरातील नागरी प्रश्नांवर मात्र केवळ आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. महापालिकेच्या अनेक वॉर्डात नालेसफाई अद्याप झालेली नाही. काही ठिकाणी गटार तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम गतीने करण्याचे वारंवार सांगण्यात आले तरी प्रत्यक्षात काहीही बदल दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. “महापालिकेच्या वर्धापन दिनाचा खर्च जर मक्तेदारांकडून उचलला गेला असेल, तर त्याचा तडका पुन्हा नागरिकांच्या माथीच पडणार. नंतर पाणीपुरवठा, सफाई, लाईट यांसारख्या सेवा देताना त्या खर्चाची वसुली केली जाईल,” असे मत एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केले.
याशिवाय काही स्थानिक उद्योजक आणि करदात्यांनीही नाराजी व्यक्त केली. “महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ढोल-ताशे वाजवून स्वतःचा आनंद साजरा केला. पण त्याच वेळी गटारात पाय घसरून पडलेला गरीब माणूस कोणाला दिसत नाही. आमचे कराचे पैसे असा उत्सव साजरा करण्यासाठीच का?” असा सवाल त्यांनी केला.
महापालिकेने या सर्व खर्चाचे आणि मक्तेदारांकडून घेतलेल्या निधीचे सविस्तर हिशेब जनतेसमोर मांडावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. काही स्थानिक संघटनांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून याची चौकशी करण्याचे ठरवले आहे.
माजी उपगनराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी या कार्यक्रमाच्या खर्चाकडे लक्ष वेधून महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या जल्लोषावर सवाल निर्माण केला आहे. अधिकाऱ्यांना गावच्या प्रश्नांशी देणेघेणे नसून शासकीय खर्चाने स्वतः ची हौस भागवली असून यावर नियंत्रण आणणे गरजेचे असताना हा कारभार झाल्याचे सांगितले तर सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी शहरात प्राथमिक नागरी सोयीसुविधा देणे मनपाला शक्य झाले नसताना असा दिखाऊपणा कशाला हवा असे मत मांडले आहे.
दोन्ही खुभ्याचे ऑपरेशन झालेली ८५ वर्षाची वृद्धा जलमय रस्त्यातून वाट काढताना

शेवटी, ढोल-ताशांचा गजर थांबल्यानंतर पुन्हा शहराच्या प्रश्नांचे ओझे नागरिकांच्या खांद्यावरच राहणार हे स्पष्ट झाले आहे. प्रशासक यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांना आपल्या जबाबदाऱ्या लक्षात येऊन प्रत्यक्ष कामाला लागण्याचीच अपेक्षा सामान्य जनतेने व्यक्त केली आहे.
————–
भाग ३ मध्ये लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाची भूमिका वाचा