
इचलकरंजी : विनायक कलढोणे
दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे जुन्या पुलावर पाणी घासत असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलावरील वाहतूक महापालिकेच्या वतीने तातडीने बंद करण्यात आली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात गत दीड महिन्यात हा लहान पूल तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यापूर्वी २४ जूनला पुलावरील वाहतूक बंद करून ३० जून रोजी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर १ जुलैला पुन्हा बंद करून १० जुलैला वाहतूक सुरू करण्यात आली. आता आज तिसऱ्यांदा पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने कर्नाटक व हुपरीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या पुलाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या पुलावर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तैनात करण्याची गरज व्यक्त होत आहे.
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे व राधानगरी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दोन दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मनपाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांनी दिली.
महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे तसेच नदीकाठी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.