
इचलकरंजी/प्रतिनिधी
शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गळती होत असून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने या संपूर्ण पाणी उपसा व वितरण यंत्रणेचे जलपरिक्षण (वॉटर ऑडीट) करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना दिले आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सध्या शहरात ३ ते ५ दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कृष्णा पाणी पुरवठा योजना (मजरेजवाडी) येथून सुमारे ३६ एमएलडी व पंचगंगा पाणी पुरवठा योजना येथून ९ एमएलडी इतका मुबलक उपसा होत असूनही पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे २०१६ मध्ये झालेल्या जलपरिक्षणासंदर्भातील अहवाल व कृष्णा-पंचगंगा पाणी उपसा तसेच वितरण व्यवस्थेची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले की, टाकवडे-शिरढोण मार्गावरून येणाऱ्या पाईपलाइनमध्ये २०% ते २५% पाणी गळती होत आहे. वितरण व्यवस्थेतील व्हॉल्व गळती, जुन्या पाईपलाईनवरील अनाधिकृत कनेक्शन तसेच पाण्याच्या टाक्या वेळेवर बंद न झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यासाठी ‘स्कॉडा बटरफ्लाय व्हॉल्व’ ऑनलाईन पद्धतीने बसविण्यात यावे, जेणेकरून गळती रोखता येईल.
शहरातील वाढती गळती, अस्वछ पाणी येणे तसेच वारंवार पाईपलाईन फुटणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने जलपरिक्षण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व यांनाही देण्यात आले आहे.