
इचलकरंजीत गुन्हेगारांना भीती नाही – पोलिसांची कारवाई ‘सवयीचा भाग’, नागरिकांचा विश्वास ढासळतोय
इचलकरंजी : विनायक कलढोणे
इचलकरंजी शहर आणि परिसरात सध्या अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला असून, अमली पदार्थ, दारू, जुगार आणि ड्रग्ससारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या अवैध व्यवसायांमध्ये केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच नव्हे, तर काही राजकीय छत्रछायेचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. परिणामी गुन्हेगारांचे फावते आणि पोलीस प्रशासन फक्त “तीव्र कारवाईचे” गाजर गात राहते, असा रोष जनतेत व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काही आठवड्यांपासून पोलीस विभागाने एकामागून एक छापे टाकून कारवाया केल्या आहेत, मात्र त्या केवळ वरवरच्या उपायांपुरत्या मर्यादित असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. “गुन्हेगार पुन्हा पुन्हा सुटतात, मग कारवाईचा उपयोग काय?” हा सवाल प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात निर्माण झाला आहे. ‘मोका’सारखा कठोर कायदा लावूनही अनेक आरोपी चार-चार वेळा सुटत असल्याचे वास्तव भीतीदायक आहे.
गुन्हेगार पोसणारे हात ‘राजकीय’ छायेखाली?
इचलकरंजी ही औद्योगिक नगरी म्हणून परिचित असून येथे देशभरातून रोजगारासाठी नागरिक येतात. येणाऱ्या नागरिकांतून गुन्हेगारीची छटा क्वचितच दिसते, मात्र अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असलेल्या काही व्यक्तींनी जुने बेकायदेशीर धंदे विस्तारून आता अमली पदार्थाच्या रकान्यात प्रवेश केल्याचे समोर येत आहे.
कधीकाळी ‘मटका किंग’ किंवा ‘जुगार क्लब किंग’ अशी ओळख असलेल्यांनी आता ड्रग्जसारख्या गंभीर व्यवसायांत पाय रोवले आहेत. त्यांच्या संपर्कातील तरुणांमार्फत विशिष्ट प्रकारची कामे करवून घेतली जात आहेत. पोलीसांसमोर चित्र स्वच्छ असले तरी कारवाईत कमतरता आणि गंभीर पुरावे न्यायालयात न सादर होणे हे गुन्हेगार सुटण्याचे प्रमुख कारण ठरत आहे.
“पोलिसांनी झलक दाखवली, पण नागरिकांना ठोसपणा हवा”
सध्याचे पोलीस अधीक्षक पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी अनेक कारवाया केल्या आहेत. ड्रग्स, गांजा, जुगार, दारू यावर छापे टाकण्यात आले. मात्र हा केवळ ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न नाही ना ?, असा संशय व्यक्त केला जातोय. “जुन्या अधिकार्यांच्या कार्यकाळात जी दुर्लक्ष झालं, त्यासाठी कोणी जबाबदार? त्यांच्या आड कारवाया थांबल्या होत्या का?” हा प्रश्न शहरवासीय विचारू लागले आहेत.
नागरिकांमध्ये पोलिसांबाबत आत्मीयता राहिली नाही
गुन्हेगारांची बिनधास्त मस्ती, राजकीय वरदहस्त आणि ढिसाळ पुराव्यांमुळे वारंवार सुटणारे गुन्हेगार हे चित्र इतकं सामान्य झालंय, की सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास ढासळला आहे. आज एखादी कारवाई झाली, तरी “यात काही होणार नाही” ही भावना नागरिकांमध्ये ठाण मांडून बसली आहे. हे चित्र धोक्याचे आहे. कारण अशा परिस्थितीत समाज फक्त दोन गटात विभागतो गुन्हेगार आणि बघ्ये.
‘गुन्हेगारी व्यवसायांचे गड’
इचलकरंजीत सध्या सुरू असलेल्या कारवाया ‘खऱ्या गुन्हेगारांपर्यंत’ पोहोचणार का? का पुन्हा एखाद्या अधिकाऱ्याच्या बदल्यानंतर सर्व शांत होणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासन आणि न्याय यंत्रणेने एकत्रितपणे शोधावी लागतील. अन्यथा इचलकरंजीचा औद्योगिक आणि सांस्कृतिक चेहरा ‘गुन्हेगारी व्यवसायांचे गड’ म्हणून झाकोळला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.