
इचलकरंजी – विनायक कलढोणे
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे आज गोरगरिबांसाठी केवळ आरोग्यसेवा केंद्र नाही, तर एक आधारवड बनले आहे. अवघ्या आठ वर्षांत या रुग्णालयाने गुणवत्तापूर्ण उपचार व सेवा यामध्ये देशपातळीवर मानांकन मिळवले असून, अपुऱ्या मनुष्यबळातही लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार करून खऱ्या अर्थाने सेवा धर्म जपला आहे.
गेल्या तीन वर्षांतच तब्बल ६ लाख २३ हजारांहून अधिक रुग्णांनी उपचारासाठी या रुग्णालयावर विश्वास दाखवला. सध्या दररोज ८०० ते १००० बाह्यरुग्ण, तर १८५ आंतररुग्ण उपचार घेत आहेत, ही आकडेवारी स्वतःच रुग्णालयाच्या विश्वासार्हतेचा प्रत्यय देते.
नुकत्याच झालेल्या ‘कायकल्प’ राष्ट्रीय मानांकनात देशात प्रथम क्रमांक, तसेच डीएचएस रँकिंगमध्ये २७ व्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानावर झेप घेतलेली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत या रुग्णालयाचा एक विशिष्ट आदर्श म्हणून उल्लेख होतो आहे.
नव्या सेवा, नव्या सुविधा
रुग्णसंख्येच्या गरजेनुसार रुग्णालयात सिटी स्कॅन, डायलिसिस, ४० प्रवेश क्षमतेचे परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, तसेच नेत्रशस्त्रक्रिया, नवजात शिशू कक्ष, पोषण पुनर्वसन केंद्र, अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले आहेत.
शिवनाकवाडी येथील अन्नविषबाधा प्रकरणात २३८ रुग्णांना वेळेवर व उत्कृष्ट सेवा देऊन रुग्णालयाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली. गावकऱ्यांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी रुग्णालय प्रशासनाचे जाहीर अभिनंदन केले.
आमदारांचा पाठपुरावा व आगामी योजना : एमआरआय यंत्रणा, रक्तपेढी, इलेक्ट्रिक अॅम्ब्युलन्स यासाठी रुग्णालयाने प्रस्ताव सादर केले असून, आमदार राहुल आवाडे यांच्याकडून सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
आकडे सांगतात यशोगाथा
वर्ष | उपचार घेतलेले रुग्ण |
---|---|
२०२२-२३ | १,२८,६१९ रुग्ण |
२०२३-२४ | १,९७,२१९ रुग्ण |
२०२४-२५ | २,३६,६३२ रुग्ण |
एप्रिल ते जून २०२५ | ५९,२८८ रुग्ण |
वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांचे मत
“अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही आमचा स्टाफ दिवस-रात्र मेहनतीने काम करत आहे. लाखो रुग्णांवर उपचार करताना आम्ही सेवा हीच आमची निष्ठा मानतो. आम्हाला अभिमान आहे की आमच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर होतो आहे. मात्र, काही वेळा आवश्यक तज्ज्ञांच्या अनुपस्थितीमुळे अपघाती किंवा गंभीर रुग्ण बाहेर पाठवावे लागतात, ही आमच्यासाठीही वेदनादायक बाब असते. समाज आणि राजकीय क्षेत्रातील प्रत्येकाने आमच्या सेवेला सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण रुग्णांचे मनोबल हेच आमच्या कामाचे बळ आहे.“
समाजाने या रुग्णालयाच्या कार्याचा अभिमान बाळगावा आणि इथल्या सेवा व्यवस्थेकडे प्रेरणादायी दृष्टिकोनातून पाहावे, हाच खरा आरोग्याचा खरा विजय ठरेल.