
इचलकरंजी : विनायक कलढोणे
इचलकरंजीत पोलिसांच्या वर्तणुकीने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलीस कर्मचारी कसे वागायचे यासाठी संविधानाने आचारसंहिता घालून दिली आहे, प्रशिक्षण दिले जाते. तरीसुद्धा काही पोलीस अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य न जपता नागरिकांवर रोब गाजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गांधी पुतळा चौकात दहीहंडी उत्सवाच्या वेळी खाकी वर्दीतील एका अधिकाऱ्याने पूर्ण पोशाख परिधान न करता – डोक्यावर टोपी न घालता – गर्दीत नागरिकांवर रोब जमवला. सण उत्सव म्हटल्यानंतर गर्दी होणारच, मात्र कार्यक्रम वेळेत संपल्यानंतर गर्दी हळूहळू निघून जात असताना हा रोबशाहीपणा का दाखवला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
यात अधिक संतापजनक बाब म्हणजे एका पत्रकाराने हा प्रश्न विचारताच, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने ५० फूट अंतरावरून पुढे येत “बघून घेईन” अशी भाषा वापरली. वर्दीवर असताना टोपीच न घालणाऱ्या या अधिकाऱ्याने कर्तव्याची जाणीव विसरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकाराची चर्चा संपूर्ण इचलकरंजीत रंगली असून पोलिसांच्या शिस्तबद्ध प्रतिमेला गालबोट लागले आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी असलेली खाकी वर्दी, जर सर्वसामान्यांवर रोब जमवण्याचे साधन ठरत असेल तर त्याचा विचार सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस–पत्रकार संवादाची गरजसध्या सण-उत्सवाचे दिवस सुरू आहेत. गणेशोत्सव, नवरात्री आणि दीपावली हे मोठे सण समोर आले आहेत. गर्दीच्या काळात पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यात संवाद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज सेवक आहेत, तर जनतेच्या भावना आणि अडचणी पोहोचवणारा पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ मानला जातो. त्यामुळे दोन्ही घटकांमध्ये समन्वय, आदर आणि संवाद वाढवणे ही काळाची गरज आहे.