रुपेश नरवाडे याला अटक : मागितली माफी

इचलकरंजी | जिथे तुम्ही दहशत करण्यास विचार करता तिथे आम्ही वन साईड किंग आहोत यासह रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना आणि अन्य आव्हान देणारे रिल्स प्रसारीत करणे रेकॉर्डवरील गुन्हेगार व जर्मनी गँगचा सदस्य रुपेश पंडीत नरवाडे याला महागात पडले. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून चांगलीच समज दिली. त्याने व्हिडीओद्वारे माफीही मागितली आहे. पोलिसांनी तो व्हिडीओ जारी केला आहे.
इचलकरंजी शहरात जर्मनी गँगची दहशत कायम असून आठ दिवसांपूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार जर्मनी गँगचा सदस्य रुपेश नरवाडे याचा वाढदिवस रस्त्यावर साजरा करण्यात आला होता. याप्रकरणी गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल 11 जणांवर गुन्हे दाखल केले होते. अटक केलेल्या सहा संशयीतांना शहरातील विविध भागात तपासासाठी फिरवले होते. त्यातच आणखीन काही आव्हान देणारे रिल्स नरवाडे यांनी सोशल मिडीयावर टाकले होते. ‘गावलो तर मारुन टाक, वाचलो तर नंतर बघू पुढे सगळे’, ‘सगळ्यांचे उडणार आहेत होश कारण नानांच्या वाढदिवसात आहे जोश’, ‘ज्याठिकाणी दहशत करण्याचा विचार करता तुम्ही त्याठिकाणी वनसाईड किंग आहे आम्ही’ असे वेगवेगळे तीन रिल्स पोलिसांच्या निदर्शनास आल्याने नरवाडे याला ताब्यात घेवून समज देण्यात आली. गुन्हेगारी संदर्भात आव्हान देणारे रिल्स कोणीही बनवू नयेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र कळमकर यांनी केले आहे.