
– विनायक कलढोणे
इचलकरंजी : बोलाचा भात, बोलाचीच कढी या उक्तीप्रमाणे इचलकरंजीचा पाणी प्रश्न व योजना बनली आहे. दर पाच/दहा वर्षांनी एक नवी योजना इचलकरंजीच्या माथी नावापुरते मारायची आणि त्याला वादाचा झालर जोडून योजना लटकवत ठेवायची. शेवटी ती योजना गुंडाळून टाकायची. आता गेली दहा वर्षे गाजत असलेल्या सुळकूड योजनेचे अंतिम संस्कार करून नव्या योजनेचे बारसं करण्यात आल्याने इचलकरंजीचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा व संतापाचा विषय ठरत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, इचलकरंजीला मोठ्या दिमाखात मंजूर झालेला बहुचर्चित सुळकूड पाणी पुरवठा योजना आता बंद केल्याचा अहवाल सरकार पुढे आहे. आणि पुन्हा नवे पाच पर्याय सुचविले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट झाल्याचे वृत्त आहे. सदरचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात जोरात चर्चा होत आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला पुन्हा पाण्यासाठी येरे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या दहा वर्षात इचलकरंजी शहराला दोन पाणीपुरवठा योजना तत्कालीन सरकारने मंजूर केल्या. त्यामध्ये भाजपशासित युतीचे सरकारने वारणा पाणी योजना तर शिवसेना शासित महाविकास आघाडी सरकारने सुळकुड योजना मंजूर केली. योजना मंजूर करताना अधिकाऱ्यांनी सर्व शासकीय बाबी पूर्ण करून घेतल्या होत्या. रितसर ना हरकतीचा अहवाल ही सादर केला होता. त्यानंतरच तत्कालीन जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरीने या योजना मंजुरी झाल्या. आणि शुभारंभाचा नारळ फुटताच या योजनांच्या विरोधालाही तोंड फुटले. ऐनकामाच्या वेळेला योजनेतील गावकऱ्यांचा विरोध होऊन दोन्ही योजना बारगळल्या. एखादी योजना देताना शासन सर्व बाबींची माहिती घेऊनच ती मंजूर करत असते मग दोन्ही सरकार व अधिकारी हे योजना मंजूर करताना खोटा अहवाल दिला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
इचलकरंजीच्या तात्कालिन व आजच्या खासदार, आमदारांनी अहवाल न वाचताच गुलाल उधळला का? हा पण प्रश्न आहे. कारण योजना मंजूर होताच पान पानभर जाहिराती छापून स्वतः ची छबी उजळविण्याचा प्रयत्न झाला. आणि मीच इचलकरंजीचा “खरा भगीरथ” अशी प्रसिद्धी करण्यात आली पण आता दोन्ही योजनांना शासन दरबारी कचऱ्याची टोपली दाखविल्याने आता हे लोक प्रतिनिधी कोणता नवा बहाणा इचलकरंजी समोर आणणार याची विचारणा होत आहे.
इचलकरंजीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी अनेक बैठका झाल्या. त्यात योजना मंजूर असूनही ती पुर्ण होऊ शकत नाही याचा कोणालाच कसा अंदाज आला नाही. याचे गौडबंगाल काय? केवळ योजनांच्या व निधी उपलब्धतेच्या पोकळ घोषणा करून इचलकरंजीची फसवणूक करण्यात सर्वच सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला. आणि नागरिकांना अंधारात ठेवले. नागरिकांना केवळ आश्वासन देऊन निवडणूकीत बाजी मारली आणि आता अपना काम बनता, भाड में जाये जनता म्हणतं इचलकरंजीला पाण्यासाठी पुन्हा वंचित केले आहे.
दोन्ही सरकारवेळी मंजूर झालेल्या योजनेत विद्यमान सरकारचे घटक पक्ष आजही आहेत. ते डोळे झाकून होते का? आज जलसंपदा मंत्री “सुळकूड योजनेचा विषय संपल्याचे जाहीर करतात” मग या लोकप्रतिनिधींना काहीच माहिती नव्हते का?
मंजूर योजना पूर्ण करण्यास नेमका कोणता राजकीय अडथळा निर्माण झाला हा प्रश्न सध्या इचलकरंजीकरांना पडला आहे. इचलकरंजी शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर व कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. इचलकरंजीला मिनी मुंबई म्हणून देखील ओळखले जाते. इथे येणारा कामगार व व्यावसायिक हा देशभरातून आपल्या पोटासाठी, उद्योग पाण्यासाठी येतो. इचलकरंजी शहर सर्वांना पोटात घेते व काम देते. आता यांना पाणी देण्याचे काम सरकारची नाही तर नेमके कुणाचे आहे.
गत दोन लोकसभा, विधानसभा निवडणूक ही पाणी प्रश्नावरच झाली.मीच पाणी आणणार म्हणणारे आता मूग गिळून गप्प झालेत. विद्यमान आमदार, खासदारांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्यासाठी काय केले हे जाहीर करावे, जलसंपदा मंत्री अहवाल वाचताना विषय नेमका कसा गोल केला हे सांगावे. अन्यथा इचलकरंजीची फसवणूक झाली हे मान्य करावे असे बोलले जात आहे.
इचलकरंजीला शासन नेहमी असे झुलवत ठेवणार तर येथील उद्योग, व्यवसाय मोडकळीस येण्यास वेळ लागणार नाही. पाण्यावाचून लोकांना शहर सोडावे लागेल. भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होईल याची जाणीव शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही का? की गेंड्यांची कातडी पांघरूण इचलकरंजीचा अंत बघत आहेत असा सवाल निर्माण होत आहे.
इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे महसूल देणारे शहर आहे. वीज असो वा जीएसटी बिल सर्वात मोठा कर इचलकरंजीकरातून राज्य व केंद्र सरकारला मिळतो अशा परिस्थितीत सरकारने या शहराकडे दुर्लक्ष करणे म्हणजे हे शहर या देशात आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे.वारणा गेली, सुळकूड गेलं आता काय चंद्रावरून योजना आणणार काय? .. निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र येणारे लोकप्रतिनिधी इचलकरंजीच्या पाण्यासाठी कधी एकत्र येणार आणि हा पाणी लढा यशस्वी करून दाखविणार अशी विचारणा नागरिकांतून होत आहे. परंतु वास्तवात मात्र आता इचलकरंजीला कोणी भगीरथ नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पुन्हा बे एके बे चा पाढा म्हणावा लागणार हेच खरे.