
इचलकरंजी : येथील दि इचलकरंजी इंडस्ट्रीयल को-ऑप. इस्टेट लि या संस्थेची सन 2025-26 ते 2030-31 या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आवश्यक जागेइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी. आर. पोवार यांनी केली आहे.
दि इचलकरंजी इंडस्ट्रीयल को-ऑप. इस्टेट ही संस्था अत्यंत जुनी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 15 जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या नुतन संचालक मंडळात कारखानदार गटातून राजेंद्र महादेव बिद्रे, महादेव शंकर कांबळे, सुनिल सातगोंडा पाटील, निलेश बापुलाल चंगेडीया, सागर विजय कोईक, उदय शंकर आदर्शे, विजयकुमार रामस्वरुप पारीक, सोसायटी गटातून राहुल प्रकाश खंजिरे, इतर गटातून प्रकाश राजाराम नवनाळे, आनंद गिरीधारीलाल मालू, अनुसुचित जाती जमाती सभासद प्रतिनिधी गटातून किरण हिंदुराव कांबळे, इतर मागासवर्ग गटातून सुहेल दस्तगीर बाणदार, महिला गटातून उमा रविंद्र मुरदंडे व हसिना रियाज गैबान आणि भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून आदाप्पा भरमू हांडे यांचा समावेश आहे.
संस्थेची निवडणूक बिनविरोध करुन सभासदांनी माझ्यावर व माझ्या सहकार्यांवर जो विश्वास दाखविला आहे, त्याला भविष्यात आणखीन बळकटी दिली जाईल. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया चेअरमन राहुल खंजिरे यांनी व्यक्त केली आहे.