
इचलकरंजी : शहरात बंदी असलेले सिंगल युज प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असल्याने महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यामार्फत महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले.
या मोहिमेअंतर्गत व्यापारी, दुकानदार, भाजी व फळ विक्रेते यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी १२ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करून संबंधित व्यापाऱ्यांकडून एकूण ८,००० रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेकडून सिंगल युज प्लास्टिक विरोधी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानदार, फळ-भाजी विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे. तसेच नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह न धरता कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.