
इचलकरंजी : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी शुद्ध पेयजल प्रकल्प तातडीने सुरू करावेत आणि कृष्णा योजना सक्षमीकरणाचे अंतिम टप्प्यातील काम वेळेत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार राहुल आवाडे यांनी दिल्या.
शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील कूपनलिकांवर टायमर बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच १५ मार्चपर्यंत कृष्णा योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सुळकूड योजना लवकर अमलात आणावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील १०,००० नागरिकांना शुद्ध पेयजल प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी स्वतःच्या खर्चाने कार्ड वितरित करण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच ९४ कूपनलिका दुरुस्त करण्याची जबाबदारीही स्वखर्चाने पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. आमदार आवाडेंच्या या पुढाकारामुळे शहरातील नागरिकांना लवकरच शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.