
इचलकरंजी – “विधवा झालेल्या महिलांना समाजात हीन लेखण्याऐवजी त्यांना ‘विरांगना’ म्हणून सन्मान मिळायला हवा,” असे प्रतिपादन राष्ट्रसंत कमलमुनीजी कमलेश यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (११ मार्च) विरांगना सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महावीर जैन भवन येथे होणाऱ्या या सोहळ्यात श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, इचलकरंजी आणि श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये संघर्षमय जीवन जगणाऱ्या विधवा महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भारतीय जैन दिवाकर विचार मंच, नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महर्षी संत भारत भूषणजी व राष्ट्रीय महिला अध्यक्ष मंगला भंडारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राष्ट्रसंत कमलमुनीजी यांनी विधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवत “त्या सतीपेक्षा मोठ्या वीरांगना आहेत,” असे सांगितले. तसेच गो-रक्षण, नशाबंदी, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक नैतिकता यांसाठी संतांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष रमेश जैन, माजी अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया, उपाध्यक्ष राहुल बोरा यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.