
हुपरी : येथील 5 कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांचा 72 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या निमित्ताने कारखान्याच्यावतीने विविध सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्यामध्ये तब्बल 1200 दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ’सेवेतच जीवनाची खरी प्रतिष्ठा असते’ या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवक तसेच नागरिकांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. या उपक्रमासाठी इचलकरंजीतील आधार ब्लड बँक, लायन्स ब्लड बैंक, जयसिंगपूर येथील तुलसी ब्लड बँक, कोल्हापूर येथील संजीवनी ब्लड बँक, वैभवलक्ष्मी ब्लड बँक, सांगली येथील एमएसआय ब्लड बँक, प्रकाशबापू ब्लड बँक आणि चिक्कोडी ओंकार ब्लड बैंक अशा 8 ब्लड बँकेकडे रक्तदान करण्यात आले.
तसेच कारखान्याचे संचालक, अधिकारी यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळी प्रतिवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे परिसरातील हरित क्षेत्र वाढवण्याचा आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृक्षारोपणानंतर झाडांची नियमित निगा राखण्यासाठी देखील नियोजन आखण्यात आले आहे. हा उपक्रम भविष्यातही असाच सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी केला.