
इचलकरंजी : येथील सहकारनगर परिसरात २ गटातील वादातून एका गटाने चारचाकी वाहनाच्या काचा फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून गावभाग पोलिसांनी १३ जणांना अटक केली होती. या सर्वांना पोलिसांनी या भागात तपासासाठी फिरवले.
सहकारनगर परिसरात सेंट्रींग व्यावसायिक दत्ता देडे यांना बच्चन कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी तु मुलांच्या भांडणामध्ये पडतोस, तुला २ दिवसांत जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत कोयता दाखवत दहशत निर्माण केली. यानंतर कोयता, चाकुने वार करण्याचा प्रयत्न करत चारचाकी वाहनाची तोडफोडीचा प्रकार घडला. याप्रकरणी दत्ता देडे यांच्या फिर्यादीनुसार १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर भाजीपाला विक‘ेते आदित्य निंबाळकर, अर्जुन भोसले आणि प्रेम कांबळे यांनाही विविध ठिकाणी शिवीगाळ करत मारहाण करून धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी निंबाळकर याच्या फिर्यादीनुसार १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या संशयीतांचा शोध घेवून पोलिसांनी दोन्ही बाजुच्या १३ जणांना अटक केली. या संशयीतांना पोलिसांनी तपासासाठी भागात फिरवले.