
इचलकरंजी | सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने त्यामधील सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहेत. परिणामी भागातील नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रत्येक भागातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भुयारी गटर योजना राबविण्यात आली आहे. या ड्रेनेजद्वारे सांडपाणी वाहून जाते. परंतु पाटील मळा परिसरातील ड्रेनेजची बर्याच काळापासून दुरुस्ती न केल्याने ते चोकअप झाले आहे. त्यामुळे ड्रेनेजमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहेत. दारातूनच हे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रश्नी भागातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी व तोंडी स्वरुपात तक‘ार दिली आहे. परंतु त्याला नाहक विलंब केला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने पाटील मळा परिसरातील ड्रेनेज लाईन त्वरीत दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा त्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्याही तयारी नागरिकांनी केली आहे.