
खोतवाडी (हातकणंगले तालुका): खोतवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य व सुसज्ज सांस्कृतिक हॉलचे लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. २ मे रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या नव्या वास्तूचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या सांस्कृतिक हॉलची संकल्पना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी मांडली होती. त्यांनी या प्रकल्पासाठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. परिणामी, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात आधुनिक आणि बहुउद्देशीय हॉल उभारण्यात आला आहे.
या लोकार्पण प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अंजना शिंदे, सुधाकर मणेरे, सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच सावंता माने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अमर खोत, निर्मला खोत, शिल्पा पोवार, देवकी शिंदे, सुजाता स्वामी, चंद्रकांत तांबवे, सूर्यकांत जाधव, करण खोत, अरविंद माने, अनिल माने, रोहन माने यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बजरंग चोपडे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन नलगे यांनी तर आभारप्रदर्शन वैभव पवार यांनी केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी या सांस्कृतिक हॉलसाठी झालेल्या भव्य विकासकामांचे कौतुक करत भावी पिढ्यांसाठी याचा सकारात्मक उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रतिनिधी – गजानन खोत