
इचलकरंजी | विनायक कलढोणे
इचलकरंजी शहरात कर्नाटकी बेंदूर सणाचा उत्साह भरात असताना वॉर्ड क्र. २ मधील कटके गल्ली परिसरातील नागरिक मात्र अस्वच्छतेच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. या भागात गटारीतील साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि आरोग्य धोक्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी प्रमोद बाळासाहेब बचाटे यांनी या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. “गाव आनंदात सण साजरा करत असताना माझ्या प्रभागातील कटके गल्लीमधील नागरिक मात्र सणाच्या दिवशीसुद्धा घाण पाण्याच्या समस्येत अडकले आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बचाटे यांनी सांगितले की, या समस्येबाबत महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे यापूर्वीच लेखी व तोंडी निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्यापही कायमस्वरूपी उपाय झालेले नाहीत. आज पुन्हा सकाळी नागरिकांच्या तक्रारीनंतर ते स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी केली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. नितीन भाट, SI सचिन भुते, SI किरण लाखे, वॉर्ड इन्स्पेक्टर तनवीर आगा आणि लालबेग यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात गटारांची स्वच्छता केली. मात्र JCB उपलब्ध नसल्याने पूर्ण साफसफाई होऊ शकली नाही, अशी माहिती बचाटे यांनी दिली.
या समस्येचे वारंवार पुनरावर्तन होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,” असा इशारा प्रमोद बचाटे यांनी दिला.