
हाळवणकर यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी
✍️ विनायक कलढोणे
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून, पक्षाच्या हालचालींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी यावेळी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून यादीही तयार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत आमदार राहुल आवाडे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी करून चर्चेला आणखी धार दिली आहे.
🔍 भाजपमध्ये ताकदवान इनिंगची तयारी
गेल्या दशकात भाजपने इचलकरंजीमध्ये मजबूत उभारणी केली. २०१६ च्या निवडणुकीत पक्षाने नगराध्यक्ष पदासह १५ जागांवर विजय मिळवला. यामध्ये अशोक स्वामी व तानाजी पोवार यांचा पक्षप्रवेश निर्णायक ठरला.
तत्कालीन निकाल पुढीलप्रमाणे होते:
काँग्रेस – १८, भाजप – १४ + १ नगराध्यक्षा, ताराराणी आघाडी (सागर चाळके) – ११, राजर्षी शाहू आघाडी (मदन कारंडे) – ९, राष्ट्रवादी (अशोक जांभळे) – ७, शिवसेना – १, अपक्ष – २, स्वीकृत सदस्य ५
📌 काँग्रेसमध्ये गळती, भाजपमध्ये शक्तीसंचय
२०१६ ला काँग्रेसने १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यातील ९ नगरसेवकांनी आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेश केला आहे. हे सर्वजण सध्या माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या विश्वासू गटात सक्रिय आहेत. यामुळे भाजपमध्ये सुरेश हाळवणकर आणि आमदार राहुल आवाडे या दोनही गटांची उमेदवार संख्येची क्षमता लक्षणीय असून, पक्षाला स्वबळावर लढणे अपरिहार्य बनते आहे. अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
🧮 शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस – विरोधकांचे समीकरण शिवसेना (शिंदे गट) – जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी ४० हून अधिक जागांवर उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे.
राष्ट्रवादी (चोपडे-जांभळे गट) – २० हून अधिक जागांवर लढणार आहेत.
काँग्रेस, चाळके, कारंडे व उबाठा गट जर महाविकास आघाडीत एकत्र आले, तर त्यांना महायुतीमधील नाराज भाजप उमेदवारांचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो.
🧭 महापालिका रणसंग्राम – स्वबळाची कसोटी
राजकीय संख्याबळ, गटीय गणिते आणि कार्यकर्त्यांची निष्ठा पाहता, भाजपला स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास उमेदवारांचे व्यवस्थापन आणि नाराज गटांची समेट प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.दुसरीकडे, महाविकास आघाडी व इतर प्रबळ गट भाजपमधील अंतर्गत ताणांचा फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.