
इचलकरंजी | येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कर्मचार्यास मारहाण करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. रुग्णालयातील वैद्यकीय आधिकारी, कर्मचार्यांना धक्काबुक्कीच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे या प्रकाराचा निषेध करत मंगळवारी सकाळी रुग्णालय प्रवेशद्वारात जमत कर्मचार्यांनी मारहाण करणार्यांवर कारवाईसह रुग्णालयातील पोलिस चौकीत कायमस्वरुपी पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सोमवारी रात्री योगेश जाधव कामावर होते. त्यांनी रुग्णास भेटण्यासाठी आलेल्या एका परप्रांतिय तरुणास बुट बाहेर काढण्यास सांगितले. त्या कारणावरुन त्या तरुणाने जाधव यांच्याशी हुज्जत घातली. रुग्णालयातील अन्य कर्मचार्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या तरुणाने जाधव यांना मारहाण करण्यासह धमकी दिली. त्यामुळे काही काळ गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत त्या तरुणास बाहेर काढले.
या रुग्णालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. अपघातग्रस्तांवर उपचार, शवविच्छेदनावेळी वादावादी, धक्काबुक्कीचे प्रकार सतत घडतात. त्यामुळे या घटनेचा निषेध करत मंगळवारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात जमत कर्मचार्यांनी जाधव यांना मारहाण करणार्यावर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, अशा गोंधळावेळी संतप्त नागरिक सुरक्षारक्षकांनाहीजुमानत नसल्याने याठिकाणी पोलीस कर्मचार्यांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात पोलीस चौकी उभारण्यात आली असली तरी ती नावालाच असून या चौकीचीही दूरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलीस चौकीची आवश्यक ती दुुरुस्ती करुन याठिकाणी कायमस्वरुपी पोलीस नेमण्याची मागणी होत आहे.