
इचलकरंजी | शहरातील शिवतीर्थ परिसरात असणार्या मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रेत्या गाड्यांच्या स्थलांतरबाबत नगर पथविक्रेता समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथील विक्रेत्यांना आयुक्त पल्लवी पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्या सहकार्याने रजिस्टर ऑफिससमोरील पार्किंगलगतची जागा उपलब्ध करून दिली आहे.
शहारात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. या अनुषंगाने शहरातील सर्व चिकन 65, बिर्याणी, तंदुरी विविध प्रकारच्या मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले होते. परंतु हातावरचे पोट व याच व्यवसायावर उदरनिर्वाह चालत असल्यामुळे आयुक्त पल्लवी पाटील यांना संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष तथा पथविक्रेता समिती सदस्य दिपक पाटील यांनी अशा विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर करण्याची विनंती करण्यात आली होती.
नगर पथविक्रेता समितीच्या बैठकीत मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार सर्वप्रथम शहरातील शिवतीर्थच्या दुसर्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार असल्यामुळे शिवतीर्थच्या 100 मीटरच्या आत असणार्या सर्वच बिर्याणी, चिकन 65 व तंदुरी विक्रेत्यांना हलवण्यासाठी दिपक पाटील यांनी विक्रेत्यांची बैठक घेतली व सर्व विक्रेत्याना रजिस्टर ऑफिससमोरील पार्किंगजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे.
विक्रेत्यांनी या परिसराची स्वच्छता करून स्वखर्चातून चार एलईडी लाईटची व्यवस्था केली आहे. याठिकाणी 10 विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरु केला असून शिवतीर्थ परिसर हा मांसाहारी पदार्थ विक्रीपासून मुक्त करण्यात यश आले आहे. याकामी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. तर इचलकरंजी शहराध्यक्ष सतीश नायडू, पथविक्रेता समिती सदस्य सौ. अश्विनी कुबडगे, सौ. लक्ष्मी कांबळे, श्रीमती सुवर्णा कुसाळे, समीर सोलापुरे, मनीष नायडू, राकेश माळी, श्रीनिवास फलपाटी, श्रीमती वेणूताई पोवार, तसेच मिलिंद माने, महंमद देसाई, अरुण शेंडे, सुनील पाटील, सिद्धार्थ कांबळे, श्रावण सावंत यांच्यासह विक्रेते उपस्थित होते.