
इचलकरंजी : विनायक कलढोणे
इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमधील विद्यार्थी यश यादवच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून टाकले आहे.
शिवसेना (उबाठा) युवासेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपात गेल्या काही दिवसांपासून अनेक पालक आपल्या पाल्यांवर होणाऱ्या मानसिक तणाव, शैक्षणिक दबाव आणि संस्थेतील व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे अस्वस्थ होते. मात्र यशच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या अस्वस्थतेने संतापाचा स्वरूप घेतला आहे.
‘तांब्यांची श्रद्धा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिक्षण संस्थेतील शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि अभ्यासाच्या नावाखाली होणारा अवास्तव ताण यामुळेच यशसारखा विद्यार्थी आत्महत्येस प्रवृत्त झाला, असा ठपका पालकांनी आणि युवक संघटनांनी ठेवला आहे.
शिवसेना (उबाठा) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयास धडक देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी देखील या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेण्याऐवजी व्यवस्थापनाने दडपशाही पध्दती अवलंबल्याचा आरोप करत, शहरातील अनेक पालकांनी आपली ‘श्रद्धा’ गमावल्याचे खुलेपणाने सांगितले आहे. शिक्षणाच्या जात्यात विद्यार्थ्यांचे भवितव्य भरडले जात असल्याची भीती आता सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
ही घटना केवळ एक आत्महत्या नसून शिक्षण व्यवस्थेतील बिघाडाचे भयावह चित्र आहे. आता प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर याचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात, असा इशाराही युवासेना देत आहेत.