
इचलकरंजी | विनायक कलढोणे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वाजतगाजत येणारं बँड आता सुरात अडकलेलं दिसतंय. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचना कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्यानं निवडणुकीचं ढोल वाजण्याआधीच झोपा घेण्यासाठी टाकण्यात आलं आहे. साडेतीन वर्षांपासून ‘तोंडावर पान’ ठेवलेले इच्छुक उमेदवार आता चौथ्या वर्षाच्या दारात उभे, पण दार उघडत नाहीय!
“दिवाळीपूर्वी होईल हो!” अशा आशेवर बाशिंग बांधून बसलेले हे भावी नगरसेवक आता गणपतीपासून थेट नववर्षाकडे बघतायंत. निवडणूक आली नाही तरी ‘खर्च’ मात्र काटेकोरपणे सुरूच आहे. फराळाच्या पातेल्यांपासून ते गणेशोत्सवाच्या स्वागतपर फलकांपर्यंत सगळं काही तयार… फक्त मतदान पेटी आणि मतदारच नाहीयेत!
सप्टेंबर नव्हे, आता ऑक्टोबरचं स्वप्न!
महानगरपालिकेच्या हद्दींचं नकाशा गुगल मॅपवर फेरफार करून आता वेळेचा मणकाच वाकवण्यात आला आहे. प्रभाग रचना, हरकती, सुनावण्या, आरक्षण सोडत, मतदार यादी… हे सगळं पूर्ण होईपर्यंत वेळ फुल्ल! त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीत मतदानाची घंटा वाजण्याची शक्यता आहे.
माजी नगरसेवकांचा ‘बेरोजगार’ वर्ग
काही जण तर निवडणुका नाहीत म्हणून चक्क पुन्हा व्यवसाय-नोकरीत गुंतलेत! एकेकाळी सभागृह गाजवणारे माजी नगरसेवक आता सुवर्ण भविष्याच्या शोधात बँकेत लोन मागायला जातायत. नवीन इच्छुक उमेदवारांनाही आता विचार करावा लागतोय — ‘आपण खरोखरच उमेदवार आहोत की ग्राहक?’
हद्दींत फेरफार, पण हद होत चाललीय…
गेल्या वेळेच्या कार्यक्रमाप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये प्रभाग ठरवून सप्टेंबरमध्ये जाहीर करायचं होतं, पण आता तर तारीख बदलली की ठरावही बदलतो अशी परिस्थिती. हद्दींच्या नकाशाला ‘झूम इन’ करून करून इच्छुक उमेदवारांनां डोळ्यात ड्रॉप घालावं लागतंय. सध्या तर एक ‘नकाशा-युद्ध’ सुरू आहे.
थोडक्यात काय?
इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, हे ठरवणाऱ्यांनाच माहिती नाही. आणि जे लढणार आहेत, ते सध्या फराळ करायचं की प्रचार यंत्रणा लावायची – या द्विधा मन:स्थितीत आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आता दिवाळीसाठी ‘लाडू’ आणि नववर्षासाठी ‘मनोगत’ तयार ठेवावं. कारण सध्या “निवडणुका होणार” एवढंच एकमेव ‘अंतिम न ठरलेलं अंतिम’ सत्य आहे!