
आमदार आवाडे यांचा : पाठपुरावा नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीची मिळणार भरपाई
इचलकरंजी/प्रतिनिधी -माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या इचलकरंजी महसुल मंडलमधील शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत इचलकरंजी महसूल मंडलाचही समावेश केला आहे. या निर्णयामुळे महापूरासह नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या संदर्भातील अध्यादेश राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्यव्यवसाय विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
पीक विमा योजना अंतर्गत होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी मंडल स्तरावर नुकसानीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार भरपाई दिली जाते. मंडल स्तरावर पीक विमा योजना राबविल्यामुळे पीक विमा संरक्षणाची व्याप्ती वाढते व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचता येते. परंतु यामध्ये इचलकरंजी महसूल मंडलाचा समावेश नसले कारणाने महापूरात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळत होती. तर मंडल नसल्यामुळे पीक वीमा भरुनही त्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागत होते.
इचलकरंजी महसूल मंडलात केवळ इचलकरंजी व शहापूर या दोनच गावांचा समावेश होता. याठिकाणचे पीक क्षेत्र कमी असल्यामुळे प्रधानमंत्री पीक वीमा योजनेचा लाभ इचलकरंजी महसुल मंडलातील शेतकऱ्यांना मिळत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर दोन वर्षापूर्वी माजी मंत्री आवाडे यांनी या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. इचलकरंजी महानगरपालिका असलेने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अधिसूचित करणेत आलेले नाही.
परंतु, शहरालगत महानगरपालिका हद्दीत शेती पिकाखाली खरीप हंगाममध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये, ऊस तसेच रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिके, ऊस आदी पिके घेतली जातात. या पिकांचा विमा उतरावयाचा झाल्यास इचलकरंजी हे पीक विमा पोर्टलवर नसलेने इचलकरंजी व परिसरातील शेतकऱ्यांना तो उतरवता येत नाही. त्यामुळे इचलकरंजीतील सर्वच शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे इचलकरंजी हे गाव कबनूर महसूल मंडलाशी संलग्न करून पिक विमा योजनेसाठी अधिसूचित करावे तसेच इचलकरंजी हे गाव पीक विमा पोर्टलमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी लावून धरली होती.
या संदर्भातील आवश्यक तो प्रस्ताव तयार करुन तो मंजूरीसाठी राज्याच्या कृषि विभागाकडे पाठविण्यात आला होता. याकामी आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार कृषि विभागाकडून सुधारीत प्रधानमंत्री पीक वीमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीक वीमा योजनेत कबनूर मंडलातील काही गावातील पीक क्षेत्राचा समावेश इचलकरंजी मंडलात करण्यात आला आहे. त्यामुळे पीक क्षेत्र वाढले असून महापुरामुळे होणारी नुकसान भरपाई बरोबरच पीक वीमा वी योजनेचाही लाभ मिळणार आहे. या दुहेरी लाभामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.