
इचलकरंजी | विनायक कलढोणे
इचलकरंजी शहरातील ढोर गल्ली, चांदणी चौक व श्रीपाद नगर परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक शौचालयांची होत असलेली मोडतोड आणि गैरवापराविरोधात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, घरामध्ये पुरेशी जागा नसल्याने स्थानिकांना शासकीय सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. मात्र चांदणी चौक येथील सार्वजनिक सुलभ शौचालय काही समाजकंटक जाणीवपूर्वक बंद पाडू इच्छित आहेत. त्यासाठी ते शौचालयाची मोडतोड करणे, कंपाउंडच्या भिंती पाडणे, अवैधरीत्या वाहने उभी करणे, पाणी टाक्या व बोअरिंगचे पाणी खाजगी वापरासाठी वळवणे, तसेच शौचालयाच्या भिंतींचा खाजगी शौचालयासाठी वापर करणे असे प्रकार घडत आहेत.
याशिवाय शौचालयाजवळील पुरुष मुतारीस मुद्दाम पत्रे मारून बंद करण्यात आले असून त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “शौचालय पूर्णपणे बंद झाले तर आम्ही महिलांनी कुठे जावे?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. निवेदनात असा आरोपही करण्यात आला की, परिसरातील काही नगरसेवक हेच या समाजकंटकांचे पाठीराखे असल्याने कोणीही तक्रार ऐकून घेत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची ७ दिवसांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टीप – शौचालय इतके दुर्गंधीयुक्त व विद्रूप अवस्थेत आहे की त्याचे फोटो दाखवणे शक्य नाही.