
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील कचरा व्यवस्थापन आणि उठावाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांवर सर्वत्र कचरा पडलेला दिसत असून, यंत्रणा केवळ देखाव्यासाठीच सक्रिय असल्याचे चित्र दिसते. प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठवला की दोन-तीन दिवस कचरा उचलण्याची मोहीम राबवली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती ओढवते.
शहरातील मुख्य रस्त्यांवर अशी अवस्था असेल तर विस्तार भागात कचरा व्यवस्थापनाची काय दुर्दशा असेल याची कल्पनाच न केलेली बरी. फक्त मक्तेदाराचा फायदा कसा होईल यासाठीच यंत्रणा उभी केली गेली आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
व्हिडीओ पहा 👇🏻👇🏻👇🏻
https://mymaharashtralive.com/wp-content/uploads/2025/07/VN20250706_173159.mp4
घंटागाड्यांची स्थितीही भयावह आहे. शहरात अनेक दिवसांपासून घंटागाड्या बंद आहेत. विशेष म्हणजे, या देखभाल दुरुस्तीसाठी दर महिन्याला सुमारे ३ ते ४ लाख रुपये मक्तेदाराला दिले जातात. मागील मक्तेदाराकडूनही तब्बल ७८ लाख रुपये मेंटेनन्सचे जमा करून घेण्यात आले होते. तरीही आज घंटागाड्या मेंटेनन्सच्या नावाखाली बंद आहेत. यावर कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. या निधीचा उपयोग नेमका कसा केला जातो, यावर संशोधन व्हायला हवे.
आरोग्य विभाग आणि त्यातील अधिकारी यांचे नियंत्रण शून्य असून, त्यांच्या तोंडातून नेहमी एकच उत्तर मिळते की, “मक्तेदाराचे काम व्यवस्थित सुरू आहे.” प्रत्यक्षात मात्र नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेतून रोजच वाट काढावी लागत आहे. – उमाकांत दाभोळे (शहर उपाध्यक्ष भाजप)
मक्तेदारी कराराचे तपशील :
मक्तेदार : NDK हॉटस्पाॅपोलिटी LLP, करार कालावधी : २ वर्षे, एकूण करार रक्कम : १४.६८ कोटी रुपये, वार्षिक खर्च : ७.६८ कोटी रुपये, कामाचे स्वरूप : कचरा वाहतूक आठवडे बाजार व सार्वजनिक ठिकाणांची सफाई घंटागाड्यांद्वारे घरोघरी कचरा संकलन, आवश्यकतेनुसार जेसीबी, पोकलँड उपलब्ध करणे.
नागरिक देखील आता या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत असून लोकप्रतिनिधिंनी आवाज उठवावा, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
टीप – वरील व्हिडीओ मध्ये दाखविण्यात आलेले दृश्य लिंबू चौक, रिंग रोड, कुलकर्णी मळा, राधा कृष्ण कॉलनी, इंड. इस्टेट शहापूर, विक्रमनगर, व म्हसोबा मंदिर परिसर, हिरकणी हाँटेल परीसरातील आहेत.