
इचलकरंजी | विनायक कलढोणे

इचलकरंजी महानगरपालिकेचा तिसरा वर्धापन दिन नुकताच थाटात साजरा झाला. शोभायात्रा निघाली, ढोल-ताशे बडवले गेले, झेंडे फडकले, पण सर्वात ‘लख्ख’ झळकल्या त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातातल्या तलवारी!
अहो, हातात पेन धरून फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्यांना तलवार कशासाठी? हा प्रश्न शहरातल्या चहावाल्यापासून पानवाल्यापर्यंत सगळ्यांनाच पडलाय. काहींनी तर मिश्किलपणे विचारलं, “तलवारी घेऊन काय, आता पुढच्या निविदांची छाटछूट करणार का?”

याच वर्धापन दिनाच्या निमित्तानं महानगरपालिकेने ‘आनंद उत्सव’ साजरा केला. पण शहरातील नागरिक मात्र अद्याप पाण्याच्या टाक्या, ड्रेनेज लाईन, आणि रस्त्यांवरचे खड्डे यांच्याच ‘उत्सवात’ रमले आहेत. म्हणे महानगरपालिकेचा दर्जा मिळाला, पण नागरी सुविधा अजून गावपातळीवरच!

तलवारींची परवानगी घेतली होती का? सगळ्यात गंमत म्हणजे, साधारण मिरवणुकीत काही विशिष्ट समाज तलवारी घेऊन फिरला तर पोलिस त्यांच्यावर नियमांची झडती घेतात. परवानग्या विचारतात, तपासणी करतात. मग या अधिकाऱ्यांच्या तलवारींसाठी पोलिसांनी परवानगी दिली होती का? की “अधिकारी आहेत, काहीही चालतं” या न्यायाने त्यांना मुक्तहस्ते तलवारी फिरवू दिल्या?शहरात आता कुजबुज सुरु आहे.
दरम्यान या तलवारी ठेकेदार, मक्तेदार आणि थेट शहरवासीयांचीच कातडी उतरण्यासाठी तर नव्हत्या ना? एकूण काय, ‘पेनवाल्या’ अधिकाऱ्यांच्या हातात तलवार बघून नागरिक म्हणतायत,“आमच्या समस्या सोडवायला तलवार नको, तुमच्या फाईलवर सही करणारा पेनच पुरे!”