
इचलकरंजी | चांदणी चौकातून श्रीपाद नगरमध्ये प्रवेश करतानाच आजगेकर यांच्या घरा समोरील रस्ता अपघाताचा सापळाच बनला आहे. महापालिकेने मोठ्या सारन गटारीमध्ये नळ टाकून त्यावर रस्ता केला खरा, मात्र तो रस्त्यालगतच खचला असून त्यामुळे रोज अपघात होत आहेत. या रस्त्यावरून शाळेत जाणारी मुले-मुली जात असताना त्या खड्ड्यात पडून त्यांना दुखापती होत आहेत. तसेच दुचाकीस्वार वळताना तोल जाऊन गटारीत पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.या समस्येबद्दल भागातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर भाजपचे प्रमोद बाळासाहेब बचाटे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना अनेक अपघाताच्या घटना समजल्या.
बचाटे म्हणाले, “त्या सारन गटारीवर अजून एक नळ वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. तोपर्यंत हा अपघाताचा प्रकार थांबणार नाही. त्यामुळे माझी महापालिकेला विनंती आहे की त्यांनी तात्काळ पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात व नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे. ”यासंदर्भात आयुक्त पल्लवी पाटील यांनीही या ठिकाणाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना द्याव्यात आणि काम पूर्ण करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.