
इचलकरंजी : विनायक कलढोणे
इचलकरंजीकरांसाठी अखेर सप्टेंबर महिन्यात पाणीपुरवठा नियोजनाचा नवा मुहूर्त ठरला आहे. मनपाने सध्याच्या तीन दिवसातून एकदा पाणी देण्याच्या व्यवस्थेला सप्टेंबरच्या मध्यंतरानंतर ‘एक दिवस आड’ पाणी देण्याच्या योजनेवर शिक्कामोर्तब केले आहे. पाइपलाइन बदलण्याची कामे आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतर शहरातील पाणी उपसा व साठवण यंत्रणा पूर्वपदावर येईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाण्यासाठी हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठ्यावर वीज संकटाचे सावट; इचलकरंजीकरांना त्रास
इचलकरंजी शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी मनपा प्रशासन तारेवरची कसरत करत आहे. मात्र महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्ती कामे वेळेत न केल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. पाणी उपसा व वितरणासाठी लागणाऱ्या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना वेळेत पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.
🚰 मजरेवाडी प्रकल्पातील गळतीची समस्या
मजरेवाडी जॅकवेल येथे 540 हॉर्स पॉवरचे दोन पंप आहेत, मात्र पाणी गळतीमुळे केवळ एका पंपावर उपसा सुरू आहे. मजरेवाडी ते इचलकरंजी फिल्टर हाऊसपर्यंत 17.50 किमी पाइपलाइन असून त्यातील 5.50 किमी गळतीग्रस्त पाइपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. यातील शिरढोण मळे ते लक्ष्मी मंदिर (700 मीटर) व आंबेडकर पुतळा ते जलशुद्धीकरण केंद्र (600 मीटर) अशी एकूण 1.3 किमी पाइपलाइन अद्याप बदलायची बाकी आहे.
🌊 पंचगंगा व कृष्णा नदीवरील उपसा
पंचगंगा नदीवर 300 हॉर्स पॉवरने पाणी उपसा होत असून, कट्टीमोळा डोह येथून उन्हाळ्यात तीन महिने उपसा करण्यात आला. सध्या शहरात 15 पाण्याच्या टाक्या कार्यरत आहेत, तर दोन टाक्यांचे जोडणी काम सुरू आहे. आणखी सहा नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी वर्क ऑर्डरही दिल्या आहेत.
💧 पाणीपुरवठ्याचे नियोजन
“वीजपुरवठा व पाइपलाइन कामांमुळे दोन-तीन दिवसांनी उपसा करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे सध्या तीन दिवसातून एकदा पाणी सोडावे लागत आहे. सप्टेंबरच्या मध्यंतरानंतर एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन आहे,” अशी माहिती जल अभियंता बाजी कांबळे (इचलकरंजी मनपा) यांनी दिली.
⚠️ नागरिकांना आवाहन
“पावसामुळे नळाला येणारे पाणी काही वेळा अस्वच्छ असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे व उघड्यावर अन्न खाऊ नये,” असे आवाहन डॉ. सुनीलदत्त संगेवार (आरोग्य अधिकारी, इमनपा) यांनी केले.
📝 प्रस्तावित उपाय योजना
पंचगंगा व कृष्णा (मजरेवाडी) येथील दोन्ही ठिकाणचे प्रत्येकी दोन पंप सप्टेंबरपर्यंत बदलण्याचे प्रस्तावित असून शहरातील सहा नवीन पाण्याच्या टाक्यांचे कामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी साठवण व पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी होईल, असा मनपा प्रशासनाचा दावा आहे.