
अन्यायकारक करवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन
इचलकरंजी : विनायक कलढोणे
राज्य सरकारने मद्य व हॉटेल उद्योगावर लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात इंडियन असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट (आहार संघटना) यांनी पुकारलेल्या बंदला सोमवार दि. १४ जुलै रोजी इचलकरंजी शहर परिसरातही मोठा प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व बार, परमिट रूम, मद्यविक्री करणारी ९६ परवानीधारक हॉटेल्स आणि बिअर बार बंद राहणार आहेत. मात्र जेथे केवळ नॉन-लिकर हॉटेल्स आहेत ती सुरू राहणार असल्याची माहिती इचलकरंजी हॉटेल चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सुहास लाटणे यांनी दिली.
या आंदोलनामागील प्रमुख कारणे सांगताना आहार संघटनेने मद्यावरचा व्हॅट ५% वरून थेट १०% करण्यात आल्याने, वार्षिक परवाना शुल्कात १५% आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६०% वाढ झाल्याचे नमूद केले आहे. यामुळे वर्षभरात तिप्पट करवाढ झाली असून सुमारे दीड लाख कोटींची उलाढाल असलेला उद्योग अक्षरशः बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. राज्यभरातील २० हजाराहून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत.