
इचलकरंजी : विनायक कलढोणे
महाराष्ट्र राज्य शासनाने मद्य व्यवसायावर लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात इंडियन असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट (आहार संघटना) यांच्या हाकेला प्रतिसाद देत इचलकरंजीतील सर्व परवानेधारक बियर बार, परमिट रूम व हॉटेल चालकांनी आज (१४ जुलै) दिवसभर बंद पाळला. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा बंद यशस्वीपणे पाळून शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
हॉटेल चालक-मालक संघटना (इचलकरंजी बार असोसिएशन) यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात आला. या वेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी अन्यायकारक दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. व्हॅट दुप्पट करणे, परवाना शुल्क व उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात आला आहे. या दरवाढीमुळे उद्योगच बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यामुळे शासनाने त्वरीत या मागणीकडे लक्ष देऊन वाढवलेले कर रद्द करावेत, अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांनी केली. दरम्यान, बंद दरम्यान नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.