
इचलकरंजी : विनायक कलढोणे
इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय आता अधिक सक्षम आणि आधुनिक होणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयातील विविध समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत एमआरआय यंत्रणा, ब्लड बँक, रक्त विघटन केंद्र, सौरऊर्जा प्रणाली, तसेच आवश्यक स्टाफची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नवीन नर्सिंग कॉलेज, स्टाफ निवासासाठी स्वतंत्र इमारत, आणि पोलिस चौकी उभारण्याच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालयात सोमवारी आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत इंदिरा गांधी रुग्णालयातील दीर्घकालीन अडचणी, सेवांचा अभाव आणि नागरिकांच्या तक्रारी यावर सखोल चर्चा झाली. आमदार आवाडे यांनी “हे रुग्णालय गोरगरीबांसाठी आधारवड आहे, त्यामुळे इथे कोणताही रुग्ण विनाउपचार परत जाणार नाही याची जबाबदारी शासनाने घ्यावी” अशी ठाम मागणी केली.
बैठकीत पुढील सुविधा तत्काळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला:
- 300 बेडच्या मानांकनानुसार स्टाफची तातडीने भरती
- एमआरआय यंत्रणेची स्थापना
- ब्लड बँक व रक्त विघटन केंद्र सुरू करणे
- सौरऊर्जा प्रणाली बसवणे
- नवीन प्रशिक्षण केंद्र व नर्सिंग कॉलेजसाठी अद्ययावत इमारत
- पोलिस चौकी स्थापन करणे
- पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट
- प्रयोगशाळेसाठी मायक्रोस्कोप आणि एचएलएल मार्फत प्रयोगशाळा प्रस्थापित करणे
- कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. “सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणं ही आमची प्राथमिकता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, रुग्ण कल्याण समिती सदस्य, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजीतील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने ही बैठक आणि त्यातून झालेली घोषणाही एक मोठं पाऊल ठरणार आहे. नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या आणि सुसज्ज सुविधा मिळतील, याचा विश्वास यानिमित्ताने वाढला आहे.